मातृत्व दुग्ध पेढी ठरतेय बालकांना संजीवनी

दुग्ध पेढीत आतापर्यंत सरासरी 3 हजार 450 मातांकडून दूधदान

– सागर येवले

पुणे – रक्‍तदान, अवयवदान याबरोबरच “मातेने केलेले दूध दान’ हे जगात सर्वश्रेष्ठ दान ठरत आहे. “आई’च्या या दानामुळे ससून रुग्णालयातील नवजात आणि अनाथ मुलांना संजीवनी मिळत आहे. या “संजीवनी’साठी 19 नोव्हेंबर 2013 रोजी ससून रुग्णालयात “मिल्क बॅंक’ (मातृत्व दुग्ध पेढी) ची सुरुवात करण्यात आली. आज या दुग्ध पेढीला सहा वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने “दैनिक प्रभात’ने घेतलेला आढावा…

विविध कारणांमुळे नवजात बालकाला आईचे दूध न मिळल्यामुळे बालक दगावते. अनाथांना तर त्या मातेच्या अमृताची गोडी मिळतही नाही. त्यामुळे कुपोषणाची समस्या उद्‌भवते. अशा परिस्थितीत जगात अनेकप्रकारे दान केले जात. त्यानुसार या असाह्य बालकांना दूध मिळण्यासाठी “दूधदान’ ही चळवळ ससून रुग्णालयात उभी राहिली आणि 2013 मध्ये “मिल्क बॅंक’ (दुग्ध पेढी) सुरू करण्यात आली. या बॅंकेत पैसा, सोने किंवा संपत्ती यापेक्षाही मौल्यवान आणि मुलांना संजीवनी देणारे “आईचे दूध’ दान स्वरूपात घेण्यात येते. तसेच रुग्णालयात येणाऱ्यांना मातांही आनंदाने “दूधदान’ करत आहेत. या दुग्ध पेढीत आतापर्यंत सरासरी 3 हजार 450 मातांकडून दूधदान करण्यात आले आहे.

प्रतिवर्षी 21 लिटर दुग्धसंकलन
या बॅंकेत व्हॅक्‍सीन किंवा नियमित तपासणीसाठी आलेल्या मातांना स्वत:च्या बाळाचे पोट भरल्यानंतर उरलेले दूधदान करण्याबाबत डॉक्‍टरांकडून आवाहन केले जाते. त्याला मातांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बालरोगचिकित्साशास्त्र विभागातील बाह्यरुग्ण विभागात कक्ष बनवून हे दान घेतले जाते. इच्छित मातांकडून प्रतिवर्षी 21 लिटर दुग्धसंकलन करण्यात यश आले आहे.

रक्तदान, अवयवदान याबरोबरच दूधदानही करता येऊ शकते. याची अनेकांना माहितीच नाही. त्यामुळे याबाबत जनजागृती होणे आवश्‍यक असून आपल्या बाळाचे पोट भरून झाल्यानंतर उरलेले दूधदान करता येऊ शकते. या पवित्र दानामुळे आईच्या दुधापासून वंचित राहिलेल्या बाळांना दूध मिळण्यास मदत होते. त्यासाठी मातांनी दूधदानासाठी स्वत:हून पुढे यावे.
– डॉ. आरती किनीकर,विभागप्रमुख बालरोग चिकित्साशास्त्र, ससून रुग्णालय


दहा दिवसांपूर्वीच अमेरिकास्थित सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेकडून त्यांच्या दहा दिवसांच्या भारतातील व्यावसायिक भेटी दरम्यान 7 लिटर दूधदान करून संकलन वाढवण्यास मदत केली. या दुग्धपेढीबाबत माहिती मिळताच त्यांनी ससून रुग्णालयाशी संपर्क साधून हे दान केले. या मातृदुग्ध पेढीला ब्रिटिश मेडिकल जर्नल (बीएमजे) यांच्याद्वारे “मॅटर्नल अँड चाईल्ड हेल्थ टीम ऑफ द ईअर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या मातृदुग्धपेढीच्या यशस्वी वाटचालीमुळे आता “मातृदुग्ध शोधशाळा” बालरोगचिकित्साशास्त्र विभागामध्ये प्रस्थापित करण्यात येणार आहे.
– डॉ.अजय चंदनवाले,अधिष्ठाता, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here