अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेकडून भाजपला धक्‍का

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून शिवसेना आक्रमक: अधिवेशन सुरू होताच सेनेकडून सभात्याग

नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय गोंधळात शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यातच शिवसेना खासदारांची बसण्याची जागा विरोधी बाकांवर करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपला चांगलाच धक्‍का दिला आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्याबदल्यात शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत तुटपुंजी असून, केंद्राने अतिरिक्त मदत देण्याची मागणी करीत शिवसेनेने या मुद्यावर लोकसभेत तहकूब नोटीस दिली. त्याचबरोबर अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर लोकसभेतून सभात्याग केला.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत सत्तास्थापन करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. शिवसेनेच्या निर्णयानंतर भाजपाने शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा केली. तसेच शिवसेनेच्या संसद सदस्यांची जागाही बदलण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी दिली. भाजपाच्या या भूमिकेनंतर शिवसेना संसदेत आक्रमक झाली आहे.

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तोकडी असून, शेतकऱ्यांना हजार रूपये मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना मोदी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन केले. तसेच मदतीसाठी लोकसभेत तहकूब नोटीस दिली आहे. लोकसभेत कामाला सुरूवात झाल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांनी शेतकऱ्यांना जास्तीची मदत देण्यासाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी करीत गदारोळ घातला. तसेच त्यानंतर सभागृहाचा त्याग करत सर्व खासदार बाहेर पडले.

Leave A Reply

Your email address will not be published.