नवी दिल्ली – मालदिवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू येत्या ८ जनेवारीपासून १२ जानेवारिपर्यंत चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आज याबाबतची माहिती दिली.
मालदिवचे माजी राष्ट्रपती अब्दुल यामिन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुइज्जू गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भारताचे निकटवर्तीय मानले जाणारे मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला असून मुइज्जू आता त्या देशाचे आठवे राष्ट्रपती झाले आहेत.
यामिन २०१३ ते २०१८ या काळात मालदिवचे राष्ट्रपती होते. या काळात त्यांनी चीनशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले होते. मुइज्जू हेही चीनचे मित्र असल्याचे मानले जाते. चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्या निमंत्रणावरून मुइज्जू चीनच्या भेटीवर येत असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारत आणि मालदिव यांचे कायमच घनिष्ठ संबंध राहीले आहेत. त्या देशाचे राष्ट्रपती पद ग्रहण केल्यानंतर सर्वप्रथम भारत भेटीवर येतात असा इतिहास राहीला आहे. त्यानंतर ते अन्य देशांना भेट देतात.
मात्र गेल्या काही काळात चीनने मालदिवच्या पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे अगोदर भारत भेटीची परंपरा तोडत मुइज्जू यांनी प्रथम चीनला जाण्यास प्राधान्य दिले आहे.
अर्थात मुइज्जू यांचा हा काही पहिला दौरा नाही. राष्ट्रपती झाल्यावर ते सर्वप्रथम तुर्कियेला गेले होते. त्यानंतर त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला होता. १ डिसेंबर रोजी झालेल्या कोप २८ च्या बैठकीच्या दरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती.
विशेष म्हणजे मुइज्जू सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या देशात जे ७७ भारतीय सैनिक होते त्यांना परत बोलावले जावे असे त्यांनी भारताला सांगितले होते. त्यानंतर कोप २८ मध्ये प्रथमच त्यांची मोदी यांच्याशी चर्चा झाली होती.