Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही. तुम्ही हवे तर अधिवेशन पुढे अजून आठ दिवस वाढवा. 24 डिसेंबरपर्यंत असणारे अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत अधिवेशन करा, पण आरक्षणावर निर्णय घ्या, असे जरांगे यांनी म्हंटलं आहे. यावेळी जरांगे माध्यमांशी बोलत होते.
तर आज मराठा आरक्षणाबाबत हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सरकारची बाजू मांडली. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षतेखाली याप्रकरणी 10 बैठकी झाल्या आहेत.
तर एकूण 30 बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार असल्याचं यावेळी एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे काय म्हणाले, वाचा….
24 डिसेंबरच्या पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळ मागण्याची शक्यता नाही. त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पाठबळ आहे. त्यामुळे शंभर टक्के मराठांना 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणार आहे. आता सर्व पुरावे असताना विनाकारण बहाणे सांगू नये. त्या लोकांचे ऐकून तुम्हाला मराठ्यांवर अन्याय करायचा आहे का?
त्यांचे ऐकून तुम्ही मराठ्यांच्या पोरांचे वाटोळे करणार असाल तर परिणाम वेगळे होतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जर तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर सहा कोटी मराठ्यांची नाराजगी ओढून घ्यावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.