नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंवर बलात्कार केल्याचा आरोप करत कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं आता बृजभूषण यांच्या अडचणी वाढत असतानाच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेश भाजपाने खासदार बृजभूषण सिंह यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळं आता बृजभूषण यांच्यावर मोठी कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, त्यांच्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे.
महिला कुस्तीपटूंवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर भाजपाने बृजभूषण सिंह यांना प्रचारापासून दूर ठेवलं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अयोध्या, गोंडा आणि कैसरगंज जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारात बृजभूषण कुठेही दिसलेले नाहीत. त्यामुळं आता बृजभूषण यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि यूपीतील स्थानिक भाजपचे नेते देखील बृजभूषण यांच्यावर नाराज असल्याचं दिसत आहे.