डॉक्टरांवर गुन्हा दाखलची वडिलांकडून मागणी
भिगवण – मदनवाडी (ता. इंदापूर) येथील वेदांत सोमनाथ राऊत या 14 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप आई-वडिलांसह नातेवाइकांनी केला आहे. संबंधित डॉक्टरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चिमुकल्याचे वडील सोमनाथ राऊत यांनी आरोग्य विभाग व पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती भिगवण पोलिस स्टेशन, तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
याबाबत चिमुकल्याचे वडील राऊत यांनी सांगितले की, वेदांत याला ताप आल्याने शनिवारी (दि.9) भिगवण येथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संबंधित डॉक्टरांनी त्याची तपासणी करून ऍडमिट करण्यास सांगितले. त्यानुसार त्याला दवाखान्यात दाखल केले. दहा मिनिटांनी मला व पत्नीला बोलावून घेतले आणि वेदांतला आपण इंजेक्शन दिले आहे. त्याला तत्काळ बारामती येथे घेऊन जा. मी बारामतीच्या डॉक्टरांशी फोनवरून बोललो आहे. वेदांतला आमच्या ताब्यात देण्यात आले तेव्हा वेदांत शांत होता. वास्तविक लहान मुलांना इंजेक्शन दिल्यावर ते मोठ्याने रडतात. मात्र, वेदांत शांत झाला होता.
याबाबत संबंधित डॉक्टरांना विचारले असता त्याला इंजेक्शन दिल्याने शांत झाला आहे. काही काळजी करू नका. बारामतीला तातडीने घेऊन जा, असे सांगितले. संबंधित डॉक्टरांना वेदांतचे रिपोर्ट, प्रिस्क्रिप्शन व इतर कागदपत्रे मागितली असता बारामतीच्या डॉक्टरांशी बोललो आहे. कागदपत्राची गरज नाही, असे सांगितले. आम्ही वेदांत याला खासगी वाहनातून घेऊन बारामतीकडे निघालो त्यावेळेही वेदांत रडत नव्हता, तो काहीही प्रतिसाद देत नव्हता. यावरून आम्ही घाबरलो व मदनवाडी चौफुला येथे असतानाच संबंधित डॉक्टरांना फोन लावला. परंतु तेव्हाही इंजेक्शन दिल्याने वेदांत शांत आहे असेच सांगण्यात आले.
बारामतीत पोहचल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता वेदांत याला मृत घोषीत केले. बारामती शहर पोलीस ठाण्याला माहिती देऊन शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.
वास्तविक बाळाला संबंधित डॉक्टरांनी चुकीचे किंवा जास्त डोसचे इंजेक्शन दिल्याने त्याचा मृत्यू झाला असून संबंधित डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी जि. प. सदस्य हनुमंत बंडगर, पं. स. सदस्य संजय देहाडे, भाजपचे माऊली मारकड, भिगवणच्या सरपंच वंदना शेलार आदी उपस्थित होते.
शासनाने अशा प्रकरणासाठी मेडिकल बोर्ड समिती गठीत केली असून त्यानुसार सर्व कागदपत्रे व डॉक्टरांचा जबाब घेऊन मेडिकल बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांनतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
– जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक, भिगवण
भिगवण येथील संबंधित डॉक्टरांच्या दवाखान्याला भेट दिली. तेथे डॉक्टर उपस्थित नव्हते. सदर घटनेबाबत शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा असून दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज व इतर कागदपत्रे मागविण्यात आली आहेत.
– डॉ. सुरेखा पोळ, तालुका आरोग्य अधिकारी, इंदापूर