** विधानसभेला आमचे काम करतील त्यांनाच लोकसभेला मदत
** राजवर्धन पाटील,अंकिता पाटील ठाकरे यांनी केले जाहीर
** इंदापुरात अजित पवार गटाची गोची होणार का ?
इंदापूर, (प्रतिनिधी) – बारामतीचे पवार घराणे व बावड्याचे पाटील घराणे या दोन राजकीय घराण्यामध्ये पूर्वीपासूनच राजकीय वैर आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन भाग झाले.खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्हाला तब्बल तीन वेळा शब्द देऊन फसवले आहे, असा घणाघात पाटील घराण्यातील पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे व भाजप युवा मोर्चा कोर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी केला. येणाऱ्या विधानसभेला जे आमचे काम करतील त्यांना लोकसभेला मदत करणार,अशी राजकीय भूमिका दोन्ही युवक नेत्यांनी जाहीर केल्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट व शरद पवार गटाची इंदापूर तालुक्यात अग्निपरीक्षा होणार, हे मात्र निश्चित.
यासंदर्भात अधिक माहिती अशी आहे की,इंदापूर तालुक्यात राजकीय बदल हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार,यांच्यामुळेच जनतेला पाहायला मिळाला.असे असले तरी देखील राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांना राजकीय पाठबळ देत,शासनाचा मागील तेवढा निधी पुरवत आमदार दत्तात्रय भरणे यांचे इंदापूर विधानसभेतील स्थान बळकट केल्यामुळे, अजित पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका आमदार भरणे यांनी खुलेपणाने घेतलेली दिसते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यात सध्या मागील काही महिन्यापासून लोकसभेचा प्रचार सुरू केला आहे. त्यानिमित्ताने तालुक्यामध्ये सातत्याने दौरे होत आहेत. तर, कोणीही गडबड न करता, मी सांगेल त्या लोकसभेच्या उमेदवाराचे मनापासून काम काम करावे, अशा सूचना खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात सध्या अजित पवार म्हणतील तसं असे राजकीय चित्र दिसत आहे.
आमदार दत्तात्रय भरणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला दिलेल्या उमेदवाराचे काम करणार असतील तर, उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांचे काम करण्याचा कसा शब्द देणार ? हे तालुक्यातील जनतेला सर्वश्रुत आहे. मात्र, शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे लोकसभेची निवडणूक लढणारच आहेत. सध्या या गटाने त्यांचा विधानसभा निवडणुकीसाठी अद्यापि कोणताही चेहरा जाहीर केलेला नाही. त्यामुळे राजकारणात मुरब्बी व बुजुर्ग असलेले शरद पवार इंदापूर तालुक्यात कोणता राजकीय डाव टाकतात. याकडे मात्र जनतेचे लक्ष लागले आहे.
भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून झाल्यामुळे, इंदापूर विधानसभेला हर्षवर्धन पाटील उभे राहणार की नाही. याबद्दल राजकीय चर्चा रंगू लागण्याचा प्रारंभ होताच हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील व पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरे पाटील यांनी, थेट पहिल्यांदाच पत्रकार परिषदेचे आयोजन करत, कोणी असा गैरसमज पसरवत असतील तर लक्ष देऊ नका २०२४ विधानसभा निवडणूक आम्ही लढणार आहोत, असे जाहीरच करून टाकले. त्यामुळे राज्यात भारतीय जनता पार्टी,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी जरी राजकीय युती असली तरी देखील इंदापूर तालुक्यात राजकीय विस्तव मात्र निवडणुकीच्या रिंगणाआधीच फुललेला दिसतो.