लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या निवासस्थानी करोनाच्या निर्बंधकाळामध्ये झालेल्या पार्टीचा तपास लंडन पोलिसांनी सुरू केला आहे. मेट्रोपॉलिटन पोलीस आयुक्त क्रिसेडा डिक यांनी या तपासाची माहिती दिली आहे. डाऊनिंग स्ट्रीटवर झालेल्या विविध कार्यक्रमांचा तपास स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून केला जातो आहे, असे त्यांनी सांगितले.
करोनाचे निर्बंध लागू असताना डाऊनिंग स्ट्रीट या आपल्या निवासस्थानी कर्मचारी आणि काही निवडक अधिकाऱ्यांसाठी पार्टीचे आयोजन केल्याबद्दल जॉन्सन यांच्यावर देशभरातून टीका व्हायला लागली होती.
गेल्या वर्षी झालेल्या या पार्टीशी संबंधित एक ई मेल प्रसार माध्यमांच्या हाती लागल्यावर अशी पार्टी आयोजित करण्यात आल्याचे उघड झाले होते. या पार्टीला “मद्य’ ज्याचे त्याने घेऊन यावे, अशी सूचना जॉन्सन यांनी या ई मेलमधून दिली होती. टीका व्हायला लागल्यावर जॉन्सन यांनी संसदेमध्ये अशी पार्टी आयोजित करण्यात आल्याची कबूली दिली होती आणि त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती.