येस बॅंक प्रकरण : निर्बंधाच्या एक दिवसआधी गुजरातच्या कंपनीने काढले 265 कोटी रू.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेने गुरूवारी येस बॅंकेवर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार ग्राहकांना बॅंकेतून 50 हजार रूपयांची रक्कम काढता येणार आहे. परंतु रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच गुजरातच्या वडोदरा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट या कंपनीने 265 कोटी रूपयांची रक्कम वळती केली आहे. दरम्यान, या कंपनीने ही संपूर्ण रक्कम दुसऱ्या बॅंकेत वळती केली आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम केंद्र सरकारकडून मिळाली होती. ती रक्कम स्थानिक येस बॅंकेच्या शाखेत जमा करण्यात आली होती. परंतु दोन दिवसांपूर्वीच येस बॅंकेच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली आणि बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेत ही रक्कम वळती केली, अशी माहिती बडोदा महानगरपालिकेचे उपायुक्त (प्रशासन) सुधीर पटेल यांनी दिली.

अमुक क्षेत्राला कर्ज दिले म्हणून नव्हे तर एकूणच कर्ज वितरणाच्या धोरणाबाबत शंका घेण्यासारखी स्थिती असल्याचे खासगी बॅंकेत हिस्सा खरेदी करू पाहणाऱ्या स्टेट बॅंकेने स्पष्ट केले आहे. बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिल्लीत अर्थमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर येस बॅंकेची स्थिती निर्बंध कालावधीपर्यंत पूर्वपदावर येईल, असा दावा केला. आर्थिक स्थैर्यासह ठोस आराखडयासह ही बॅंक पुन्हा सक्षम होईल, असेही ते म्हणाले.

रिझव्र्ह बॅंकेने येस बॅंकेवर निर्बंध घातल्याने या बॅंकेत ठेवी ठेवणाऱ्या राज्यातील 109 बॅंका अडचणीत आल्या असून त्यात विदर्भातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांसह काही नागरी बॅंका व काही पत संस्थांचाही समावेश आहे. या बॅंकांचे सर्व ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले होते. व्यापाऱ्यांनी येस बॅंकेशी संबंधित धनादेशही स्वीकारण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.