पुस्तकांचे महत्त्व अगाध आहे. पुस्तके वाचल्याने ज्ञान वाढते. मात्र, हीच पुस्तके तुमच्या घराच्या सौंदर्यातही भर घालू शकतात. आपल्या घरात असणारी पुस्तके योग्य प्रकारे विविधतेने मांडून घराचे, दिवाणखान्याचे वैभव आपल्याला वाढवता येते.
आपल्याकडे ब-याचवेळा पुस्तके विखुरलेली असतात. ती वेगवेगळय़ा ठिकाणी ठेवली जातात. पण, पुस्तकांचे वर्गीकरण करून सर्व पुस्तके एका सरकत्या काचेच्या शोकेसमध्ये ठेवली, तर घराचे, दिवाणखान्याचे सौंदर्य खुलून दिसतेच, पण येणा-या पाहुण्यांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसतो. बाहेरून आलेल्या व्यक्तीला जेव्हा समोर पुस्तकांचा खजाना व्यवस्थित ठेवलेला त्या घरात दिसतो, तेव्हा त्या व्यक्तीला इथे सरस्वतीचे पूजक आणि ज्ञानी, अभ्यासू माणसे राहतात हे जाणवते आणि ती व्यक्ती आदराने तुमच्याशी बोलते. त्यासाठी ही पुस्तके व्यवस्थित सजवून त्यांची मांडणी करावी आणि घराचे सौंदर्य वाढवावे.
आपल्या घरात धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि अन्य पुस्तके, कथासंग्रह, कादंब-या, मासिके, दिवाळी अंक असू शकतात. घराची श्रीमंती ही पाश्चिमात्य देशांमधून तिजोरीतील पैशावरून नाही, तर पुस्तकांच्या स्थानावरून ठरवली जाते. तो दृष्टिकोन आपणही बाळगला पाहिजे आणि पुस्तकांचे जतन नीट करून घराचे सौंदर्य आणि ज्ञान वाढवले पाहिजे. एखाद्या समारंभात छानसा बुफे मांडलेला असतो, तेव्हा आपसूक खाण्याची इच्छा होते. समोर तबला-पेटी दिसल्यावर गवयाला गायची इच्छा होते. त्याप्रमाणे पुस्तके पाहिल्यावर वाचायची इच्छा झाली पाहिजे.
पुस्तकांना छानसे आवरण घालून विषयवार त्याचे वर्गीकरण करून त्यांची मांडणी करावी. एका विषयाची, एका भाषेची, असे वर्गीकरण करून त्यांची रचना करावी. धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ, पोथ्या जर कापडात गुंडाळल्या असतील, तर त्या देवघरात किंवा अन्यत्र धूळ खात पडण्यापेक्षा चांगल्या कापडात बांधून त्यांची योग्य ठिकाणी शोकेसमध्ये स्थापना करावी. दर काही दिवसांनी त्यांची कापडी आवरणे बदलून पाहावीत.
आपण कपडे बदलून फ्रेश होतो, तसेच पुस्तकांची कव्हरे आणि पोथ्यांचे आभ्रे बदलून शोकेसमध्येही नावीन्य आणि चैतन्य निर्माण करावे. पुस्तके आणि त्यांची नावे सतत समोर दिसल्याने वाचनाची प्रेरणा मिळते. ज्या वास्तूतील, घरातील माणसे जास्तीत जास्त वाचन करतात आणि पुस्तकांचे जतन करून त्यांचा आदर करतात, त्या घरात एकोपा राहतो.