मुंबई : “मराठी बाणा’ हा सर्व प्रचलित आणि सर्वश्रृत शब्द असून या शब्दातून मराठीचे दर्शन होते. अनेकदा हा शब्द स्वाभिमानासाठीच वापरला जातो. एवढेच नव्हेतर 19व्या शतकापासून “मराठी बाणा’ या शब्दाचा वापर होत असून ऐतिहासिक पुस्तके, कादंबऱ्यांमध्ये या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यामुळे “मराठी बाणा’ या शब्दावर कोणीही वैयक्तिक दावा करू शकत नाही, असा युक्तिवाद शेमारु कंपनीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. उभयपक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला, तो उद्या देण्याची शक्यता आहे.
संगीताच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या दिग्दर्शक अशोक हांडे यांचा “मराठी बाणा’ हा कार्यक्रम गेल्या 15 वर्षांपासून सर्वश्रुत आहे. “मराठी बाणा’ या नावासाठी अशोक हांडे यांनी ट्रेडमार्क घेतले आहे. असे असतानाही शेमारू या कंपनीने आपल्या नव्या मराठी चॅनेलसाठी “मराठी बाणा’ हे नाव घेतल्याने ट्रेडमार्कचे उल्लंघन झाल्याचा दावा करत दिग्दर्शक अशोक हांडे यांनी माहीम पोलीस ठाण्यात 26 जानेवारी रोजी एफआयआर दाखल केली.
परंतु पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने हांडे यांनी चौरंग संस्थेमार्फत ऍड. राजेंद्र पै यांच्या वतीने हायकोर्टात सूट याचिका दाखल केली. कंपनीने “मराठी बाणा’ हे नाव तत्काळ हटवावे. तसेच नुकसान भरपाईपोटी 200 कोटी रुपये देण्याचे हायकोर्टाने कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली. या याचिकेवर न्यायमूर्ती बी पी कोलाबावाला यांच्यासमोर सुनावणी झाली.
यावेळी शेमारुच्या वतीने बाजू मांडताना “मराठी बाणा’ ही एक भावना आहे. कोणीही मराठीच्या स्वाभिमानासाठी हा शब्द वापरू शकतो. मराठी वाङमयचा इतिहास, कऱ्हेचे पाणी अशा प्रसिद्ध पुस्तकातून या शब्दाचा वापर करण्यात आला आहे.
तसेच अनेक वृत्तपत्र, सोशल मीडिया, टीव्ही वाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्येही “मराठी बाणा’ या नावाने कार्यक्रम केले जातात.
त्यामुळे याचिकाकर्त्यांद्वारे या नावाला आक्षेप घेणे चुकीचे आहे. याचिकाकर्त्यांनी मात्र या युकिवादाला विरोध केला. न्यायालयाने उभयपक्षांचा युक्तीवादानंतर आपला निर्णय राखून ठेवला. तो उद्या जाहिर केला जाईल, असेही स्पष्ट केले.