पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जगातील पहिला परिकथाकार हँन्स ख्रिस्तियन अँडरसन यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरात २ एप्रिल हा दिवस ‘जागतिक बाल पुस्तक दिन’ म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने सोमवार पेठेतील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे मराठी माध्यम शाळेत शिकणाऱ्या मुलांना गोष्टींची पुस्तके भेट देण्यात आली.
अस्थिशल्य विशारद डॉ. मनीष कुलकर्णी, तसेच ग्रंथप्रेमी कै. विद्या धनंजय गोखले यांच्या कुटुंबीयांनी अत्रे प्रशालेला ही पुस्तके भेट स्वरूपात दिली. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपमाला धायगुडे, प्रसाद भडसावळे, हरेश पैठणकर, केशव तळेकर, उत्तम साळवे आदी उपस्थित होते.
वार्षिक परीक्षेनंतरचा दीर्घ सुटीचा काळ मुलांना वाचनासाठी प्रेरित करण्यास योग्य असतो. हे लक्षात घेऊन त्यांना आवडतील, अशा मनोरंजक जादूमयी दुनियेची सफर घडविणाऱ्या परींच्या, राक्षस, चेटकणींच्या दुनियेची सफर घडविणाऱ्या, साहसी राजपुत्र- राजकन्येच्या, तसेच रामायण- महाभारतातील रोचक गोष्टींची पुस्तक भेट देऊन त्यांना वाचनातून आनंदाकडे नेण्याचा’ हा उपक्रम आहे, असे प्रसाद भडसावळे यांनी सांगितले. अत्रे शाळेसोबतच सोमवार आणि मंगळवार पेठेतील मुले व त्यांच्या पालकांनाही मुलांना गोष्टी वाचून दाखविण्यास प्रेरीत करण्यासाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.