मुंबई – मंत्रालय बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीचा निनावी फोन पुन्हा एकदा आला आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. निनावी फोन करणाऱ्याने मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बोलणे करून दिले नाही तर ठेवलेल्या बॉम्बने मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
निनावी कॉल आल्याच्या काही वेळातच पोलिसांनी मंत्रालयात शोधमोहीम सुरू केली आहे. मंत्रालयामध्ये डॉग स्क्वॉड देखील दाखल झाले. पोलिसांनी त्यानंतर मंत्रालयातील कानाकोपरा तपासत सर्व जागांची नीट तपासणी केली आहे. अधिक माहितीनुसार मंत्रालयात धमकीचा कॉल करणारा व्यक्ती हा मूळचा अहमदनगरचा आहे. या व्यक्तीला काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा आहे. या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ न शकल्याने त्याने त्रस्त होऊन ही धमकी दिल्याचे समजते.
दरम्यान, मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा गेटवर देखील आज अशीच काही घटना घडली. प्रशासकीय इमारतीत चाकू घेऊन जाताना एकाला ताब्यात घेण्यात आले. बॅग स्कॅनरमध्ये बॅग स्कॅन करताना धारदार चाकू सापडला. पोलिसांनी वेळीच सावध भूमिका घेतल्याने व्यक्तीच्या बॅगेतील चाकू ताब्यात घेण्यात आला. उमरगा येथून आलेल्या एका तरुणाच्या बॅगेत हा चाकू सापडला. बॅगेत चाकू घेऊन येण्यामागचे कारण काय? याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.