संकल्पचित्राचे अनावरण : देवस्थानच्या 450 एकरात होणार माउलीसृष्टीची निर्मिती
आळंदी- आळंदी देवस्थानच्या मालकीच्या 450 एकर जागेत सुमारे 100 कोटीपेक्षा अधिक रकमेची माउली सृष्टी नावाने उभारण्यात येणारे संतपीठाच्या संकल्पचित्राचे अनावरण सोहळा शनिवारी (दि. 23) पहाटे दर्शनबारीत दर्शनाचा मान मिळालेल्या सातारच्या शिवाजी जाधव या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे, विश्वस्त अजित कुलकर्णी, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र चौधर,यात्रा समिती सभापती सागर बोरूंदिया, डी. डी. भोसले उपस्थित होते. ऍड. ढगे म्हणाले की, आळंदी देवस्थानच्या मालकीचे 465 एकर जागा आहे. टेकडीवजा जागा असल्याने आणि भौगोलिक रचना व्यवस्थित नसल्याने देवस्थानला विकास करण्यासाठी ही जागा अडचणीची होती. मात्र वारकऱ्यांची गरज आणि पर्यंटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी देवस्थानने संकल्प केला आहे. याठिकाणी वारकरी आणि स्थानिक वारकरी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून जागांचा विकास केला जाणार आहे. त्याचप्रमाणे आषाढी आणि कार्तिकी वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत येतात. यावेळी आळंदी गावठाणातील जागा वारकऱ्यांना मुक्कामासाठी कमी पडू लागल्याने शहराबाहेर दिंडीकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्थितीत करून देण्यासाठी जागेचा विकास केला जाणार आहे. म्हणून माउलीसृष्टी नावाने देवस्थान संतपीठ उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात 100 कोटीची कामे केली जातील.
यामधे वारकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा देण्याचा मानस आहे. यामधे सुसज्ज भक्तनिवास, गार्डनर वृक्षलागवड, शाळा आणि वारकरी विद्यार्थ्यांच्या पेटी, तबला, पखवाज, गायनाच्या सरावासाठी अभ्याकिका केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रूग्णालय आणि तिसऱ्या टप्प्यात वारकरी शिक्षण देणारे आणि नियमित महाविद्यालये आर्थिक दुर्बल घटकांना सामोरे ठेवून उभारले जाईल. पूर्णपणे भाविकांच्या देणगीतून प्रकल्प उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात केले जाणार काम किमान पाच वर्षांत पूर्ण करण्याचा मानस आळंदी देवस्थानचा आहे. यामुळे देणगीदारांनी देवस्थानच्या कार्यालयाशी संपर्क साधून देणगी देण्याचे आवाहनही यावेळी ढगे यांनी केले.