मनोज घोरपडेंचा धैर्यशील कदमांवर आरोप ; शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल
कराड – शिवसेनेने ज्यांना उमेदवार दिली आहे, ते आयात उमेदवार आहेत. यांच्याशी माझा मुकाबला अजिबात नाही. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराशी माझा खरा मुकाबला आहे. ज्यांनी महायुतीला ब्लॅकमेल करून तिकीट आणले आहे. ते याआधीच तीन नंबरला गेलेले आहेत.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथून रॅलीला सुरुवात झाली.
ढोल ताशाच्या गजरात बसस्थानक मार्गे रॅली दत्त चौकात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे मार्गस्थ झाली. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मनोज घोरपडे म्हणाले, पाच वर्षात भाजपच्या योजना चांगल्या पद्धतीने मतदारसंघात मांडल्या. पाच वर्षात मी प्रामाणिकपणे काम केल्याने भाजप माझ्याबरोबरच आहे. त्यांनाही काही अडचणी आहेत, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेल्या टोळ्या तयार झाल्या आहेत.
टोळ्यांनी त्यांना ब्लॅकमेल करून माझी कराड उत्तरची उमेदवारी कापली आहे. जो यशवंत विचार सोडतो आणि मतदारसंघात अतिक्रमण करतो, त्याला कराड उत्तरमधील जनता योग्य उत्तर देते. जनतेच्या रेट्यावर व भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजे यांना बाळासाहेब पाटील, शिवेंद्रराजे धैर्यशील कदम या सर्वांनी मिळून एक लाख 1 हजार मते मिळवून दिली होती. पण आम्ही भाजपच्या ताकतीवर नरेंद्र पाटील यांना 67 हजार इतकी मते या भागातून दिली होती. त्यामुळे मला या निवडणुकीत एक लाख मते ही जनता देणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.