सातारा – परळी खोऱ्यातील काळोशी (ता. सातारा) येथील सूरज लक्ष्मण लामजे (वय 27) या लष्करी जवानाचा लडाखमध्ये अपघाती मृत्यू झाला. लष्करी साहित्य घेऊन जाणारी गाडी शुक्रवारी (दि. 30 ऑक्टोबर) रात्री 12 च्या सुमारास दरीत कोसळली. सूरज यांच्या मृत्यूने ऐन दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेबद्दल परळी खोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सूरज लामजे यांचे प्राथमिक शिक्षण काळोशी येथे तर माध्यमिक शिक्षण अंबवडे बुद्रुक येथे झाले होते. साताऱ्यातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांचे पहिल्यापासूनच लष्करात भरती व्हायचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी बहादूरवाडी येथील ऍकॅडमीत दोन वर्षे प्रशिक्षण घेतले आणि सराव केला होता. मुंबईत 22 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या लष्करी भरती प्रक्रियेतून सूरज लामजे हे लष्करात दाखल झाले होते. बंगळुरू येथे आर्मी सप्लाय फोर्समध्ये त्याने ट्रेनिंग घेतले होते. सूरच यांचा विवाह 2018 साली झाला होता. त्यांना आठ महिन्यांचा मुलगा असून त्यांना मुलाला प्रत्यक्ष पाहताही आले नव्हते. सूरज यांची लष्करात सहा वर्षे सेवा झाली होती. सध्या ते लडाखमध्ये कार्यरत होते.
ते दोन महिन्यांपूर्वी सुट्टी घेऊन गावी येणार होते; परंतु करोनामुळे सुट्टी मिळाली नव्हती. त्यामुळे दिवाळीसाठी सुट्टीवर येण्याचा त्यांचा विचार होता; परंतु दुर्दैवाने त्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सूरज हे लष्करात चालक होते. लष्करी साहित्य घेऊन जाताना शुक्रवारी रात्री 12 च्या सुमारास गाडी दरीत कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सूरज हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांनी अनेक मित्र जोडले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.