किशोर ढोरे
वडगाव मावळ – मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करणार्या भाजपचा बार फुसका निघाल्याचेच आज (दि. 21) स्पष्ट झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची करतानाच वज्रमुठ अधिकच घट्ट केली आहे. तर दुसर्या बाजूला भाजपला सर्वपक्षीय पॅनलचा आधार घेत काँग्रेसचा टेकू घ्यायची नामुष्की ओढावल्याने भाजपचे पॅनल पहिल्याच दिवशी बॅकफूटवर गेल्याची चर्चा मावळ तालुक्यात रंगली आहे.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 18 जागांसाठी 40 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून भाजप-काँग्रेस-शिवसेना-आरपीआय यांचा छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनेल मैदानात असून त्याविरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), एसआरपी असा सहकार पॅनल लढत देत आहे. या दोन्ही पॅनलमध्ये सरळ लढत होत असून इतर चारजण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला होता. मात्र, महाविकास आघाडीने तगडे उमेदवार रिंगणात उतरविल्याने भाजपला काँग्रेसचा टेकू घ्यावा लागला आहे. तर इतर पक्षातील काही उमेदवारांना सोबत घेऊन निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय पॅनल उभे करण्याची नामुष्की ओढावली आहे. काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीत राहण्याची घोषणा केली आहे. मात्र भाजपकडे तुल्यबळ उमेदवारच नसल्यामुळे काँग्रेसमधील एका फुटीर गटाला हाताशी धरून निवडणुकीत उतरावे लागले आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच तगडे उमेदवार मैदानात उतरविण्याच्या लढतीमध्ये तरी महाविकास आघाडीने सरशी केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. भाजपला एकटे लढणे सोपे नसल्याने त्यांनी सर्वपक्षीय पॅनलच्या आडून महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत यशस्वी ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
दोन पॅनलव्यतिरिक्त जितेंद्र परदेशी, नवनाथ हरपुडे, परशुराम मालपोटे, सुनील दाभाडे हे चार उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणारत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शिवाजी घुले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्रकुमार नेहुल, जितेंद्र विटकर, गंगाधर कोतावार, राकेश निखारे कामकाज पाहत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय
सहकार परिवर्तन पॅनलचे उमेदवार
शत्रुघ्न रामभाऊ धनवे, निलेश विष्णू मराठे, बंडू तुकाराम कदम, सुभाष रामभाऊ देशमुख, विशाल बबनराव भांगरे, प्रसाद प्रकाश हुलावळे, खंडू बाळाजी तिकोने (सर्वसाधारण कृषी पतसंस्था), नंदा देवराम सातकर, कांचन सुभाष धामणकर (कृषि पतसंस्था महिला), एकनाथ नामदेव पोटफोडे (कृषि पतसंस्था ओबीसी), शरद परशुराम साळुंखे (कृषि पतसंस्था भटक्या विमुक्त जमाती), योगेश गजानन राक्षे, शिवराम मारुती शिंदे (ग्रामपंचायत सर्वसाधारण), अस्लम जमिल शेख (ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल), अंकुश ज्ञानदेव सोनवणे (ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती), प्रकाश रामचंद्र देशमुख, नामदेव ज्ञानेश्वर कोंडे (व्यापारी सर्वसाधारण), हनुमंत ईश्वर मराठे (हमाल तोलारी सर्वसाधारण).
महाविकास आघाडी सहकार पॅनल
दिलीप नामदेव ढोरे, संभाजी आनंदराव शिंदे, सुभाष रघुनाथ जाधव, विलास सदाशिव मालपोटे, बंडू दामू घोजगे, मारुती नाथा वाळुंज, साईनाथ दत्तात्रय मांडेकर (सर्वसाधारण कृषी पतसंस्था), सुप्रिया अनिल मालपोटे, अंजली गोरख जांभुळकर (कृषि पतसंस्था महिला), शिवाजी चिंधु असवले (कृषि पतसंस्था ओबीसी), विलास बबन पवार (भटक्या विमुक्त जमाती) नामदेव नानाभाऊ शेलार, विक्रम प्रकाश कलवडे (ग्रामपंचायत सर्वसाधारण), अमोल अरुण मोकाशी (ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल), नथु शंकर वाघमारे (ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती), भरत दशरथ टकले, महेंद्र छगनलाल ओसवाल (व्यापारी सर्वसाधारण), शंकर अंतू वाजे (हमाल तोलारी सर्वसाधारण).