लखनऊ – भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी 300 जागांचे लक्ष्य निश्चित केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या घरी गेले. त्यातून भाजपच्या अंतर्गतही सर्व काही आलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे.
उत्तर प्रदेशच्य आगामी निवडणुकीसाठी भाजपचा चेहरा कोण असेल? ह्या एका प्रश्नावरून भाजपात वाद सुरु झाला. योगी आदित्यनाथ यांना पक्षातल्याच एका गटानं विरोध सुरु केला. त्यात उपमुख्यमंत्री असलेले केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, पार्टी नेतृत्व निश्चित करेन. त्यांचे वक्तव्य थंडावत नाही तेच स्वामी प्रसाद मौर्य यांनीही तिच भूमिका मांडली. त्यातून योगींच्या चेहऱ्याला विरोध असल्याचे दिसून आले. करोना काळात गंगेतून मृतदेह वाहून जात असल्याचं जगाने पाहिले. त्यातून भाजपची प्रतिमा मलिन झाली. त्याचाच फायदा योगींच्या पक्षांतर्गत विरोधकांनी उचलण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे विभाजन करुन पूर्वांचलची निर्मिती असो की, पीएमओतल्या मोदींच्या विश्वासातल्या एका अधिकाऱ्याला रिटायरमेंटनंतर मंत्री बनवण्याचा प्लॅन असो. योगी आदित्यनाथ दिल्लीत आधी अमित शाहांना भेटले, नंतर मोदींना. ह्या सगळ्या बैठकांमध्ये योगी हे स्वत:च्या भूमिकेवर अडून बसले. अशी चर्चा आहे की, मोदींनी सुचवलेला मंत्रिमंडळ विस्तार, त्यात मोदींच्या खास माणसाची लागणारी वर्णी योगी आदित्यनाथ यांनी धुडकावली. शेवटी दिल्ली ते लखनौ भाजपा नेते, संघ नेते, आमदार, पक्ष संघटनेतले पदाधिकारी यांच्यात बैठकांचे सत्र सुरु झाले
शेवटी योगीच!
कुणाचा कितीही विरोध असो पण उत्तर प्रदेशात पक्षांतर्गत वाद फार न ताणता सर्व नेत्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढण्याचे निश्चित केल्याची माहिती आहे. राजनाथसिंह यांनीही योगी आदित्यनाथ हेच चेहरा असतील अशी घोषणाही केली आहे. त्यानंतर काल योगी आदित्यनाथ हे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या नवविवाहित मुलाला आशीर्वाद देण्यासाठी मौर्यंच्या घरी गेले. तिथेच संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेही होते. दुसरे उपमुख्ममंत्री दिनेश शर्माही हजर होते. या फोटोत पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेलाय.