Anup Dhotre Loksabha Election| भाजपकडून महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 20 उमदेवारांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत अनेक खासदारांचा पत्ता कट करत नव्या चेहरांना संधी देण्यात आली.
भाजपकडून अकोल्यातही मोठी राजकीय खेळी करण्यात आल्याचे बघायला मिळत आहे. अकोल्यात गेल्या 20 वर्षांपासून खासदार असलेले भाजप नेते संजय धोत्रे यांचं तिकीट भाजपने कापलं आहे. त्यांच्या जागी संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनूप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
कोण आहेत अनुप धोत्रे?
अनुप धोत्रे यांनी पुण्याच्या सिंबायोसिस महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. त्यांचा अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग समूह आहे. यात अनुप इंजिनीअरिंग वर्क्स, सोनल इंजिनीअरिंग वर्क्स, नकुल इंडस्ट्रीज, स्प्रिंकलर सेट, एचडीपीई पाईप्स उत्पादन, बांधकाम आणि शहरी भू-विकास, रेपोल प्लास्टिकसाठी, थर्मल पॉवर प्लांटसाठी जॉब वर्क, अन्न प्रक्रिया युनिट यांचा समावेश आहे. कार्यकर्त्यांसोबत त्यांचे चांगले संबंध असून अकोल्यात त्यांना मोठी लोकप्रियता आहे. यंदा ते पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.
संजय धोत्रे चार वेळा खासदार
भाजप नेते संजय धोत्रे अकोल्यात मागील 20 वर्षांपासून खासदार आहेत. ते केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री देखील आहेत. 1999 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2004 पासून लोकसभा निवडणुकांमध्ये ते सातत्याने खासदार म्हणून निवडून आले.
‘या’ खासदारांचा पत्ता कट
भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या विद्यमान 4 खासदारांचं तिकीट कापलं आहे. यामध्ये उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक, जळगावचे खासदार उन्मेश पाटील आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश आहे.
गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियूष गोयल, उन्मेश पाटील यांच्या जागी स्मिता वाघ, मनोज कोटक यांच्या ऐवजी मिहिर कोटेचा, प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे आणि संजय धोत्रे यांच्या जागी अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा:
त्रिपुराच्या ‘महाराणी’ आणि म्हैसूरचा ‘राजा’ या दोन राजघराण्यातील वंशजांना भाजपने दिले ‘तिकीट’