- गळतीसत्र सुरूच
- पक्षाला आणखी एक धक्का
पिंपरी – भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथील भाजपच्या चंदा लोखंडे यांनी आज (सोमवारी) नगरसेविकापदाचा राजीनामा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिला आहे. भोसरी विधानसभा क्षेत्रापाठोपाठ आता भाजपला चिंचवडमधूनही धक्का बसला आहे.
2017 मध्ये चंदा लोखंडे या पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 29मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. गेल्या वर्षी पक्षाने त्यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदही दिले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला गळती सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी मोशीतील वसंत बोराटे यांनी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदा लोखंडे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन भाजपला दुसरा धक्का दिला. दरम्यान, त्यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी सात महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
याबाबत चंदा लोखंडे म्हणाल्या, प्रभागातील विकास कामांसंदर्भात पक्ष नेतृत्वाने आपल्याला कधीही विश्वासात घेतले नाही. भाजपच्या शहर नेतृत्वाला कंटाळून आपण राजीनामा दिला आहे.