आजच्या काळात टीव्हीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री लोकप्रियता आणि ग्लॅमरबाबत बॉलीवुडमधील अभिनेत्रींशी स्पर्धा करताना दिसतात. स्टाईल, फॅशन आणि ग्लॅमरद्वारे त्या टीव्ही मालिकांमध्ये काम करूनही हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींवर भारी पडताना दिसतात. हिना खान, सुरभी चंदनापासून ते निया शर्मापर्यंत अनेक अभिनेत्री टीव्ही मालिकांमध्ये काम करूनही बोल्डनेससाठी ओळखल्या जातात. त्यांची छायाचित्रे नेहमीच सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसतात. परंतु यापलीकडे अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या पौराणिक मालिकांमध्ये काम करून लोकप्रिय झाल्या, घराघरात पोचल्या आणि प्रसिद्धीस आल्या. अशा अभिनेत्रींविषयी…
मौनी रॉय –
मौनी रॉय ही टीव्हीवरील मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्या जोरावर आता तिला चित्रपटांतही संधी मिळू लागलेली आहे. देवों के देव महादेव या पौराणिक मालिकेत तिने सतीची भूमिका केली होती. या मालिकेतील भूमिकेने तिला घराघरांमध्ये पोचवले. त्यानंतर ती नागिन या मालिकेत दिसली होती. या मालिकेने तर तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले.
तेजस्वी प्रकाश
टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. कर्णसंगिनी मालिकेत तिने उर्वीची भूमिका केली होती. ही मालिका कर्णाच्या पत्नीच्या जीवनावर आधारीत होती. तिच्या चाहत्यांना या भूमिकेला भरभरून दाद दिली. सध्या ती नागिन6 मालिकेत दिसत आहे. ती बिगबॉसच्या 15 व्या भागाची विजेतीदेखील आहे.
देविना बॅनर्जी
देविना बॅनर्जीने तिच्या करिअरची सुरवात एका पौराणिक मालिकेतूनच केली होती. सगळ्यात पहिल्यांदा ती रामायण मालिकेत सीतेच्या भूमिकेत दिसली होती. त्या मालिकेत रामाची भूमिका गुरमीत चौधरीने केली होती. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता प्रत्यक्ष आयुष्यातही त्यांनी विवाह केला असून वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत आहेत.
पूजा शर्मा
स्टार प्लस वाहिनीवरून प्रदर्शित झालेल्या महाभारत मालिकेत पूजा शर्माने द्रोपदीची भूमिका केली होती. तिने ही भूमिका इतकी जीव ओतून केली की काही काळातच तिचा चाहतावर्ग तयार झाला. आज तिची ओळख टीव्हीवरील द्रोपदी अशीच आहे.
सोनारिका भदौरिया
सोनारिका भदौरिया अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली आहे. मात्र ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली ती देवों के देव महादेव या मालिकेतील भूमिकेमुळे. तिने या मालिकेत महादेवाची पत्नीची भूमिका साकारलेली आहे. या भूमिकेने तिने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. काही चाहत्यांनी तर मनोमन तिला देवी मानले होते.