हर्षवर्धन पाटील यांचा दावा
रेडा (इंदापूर, पुणे)- राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांनी सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांच्या दुधाचा खरेदीचा दर हा प्रति लिटर रू. 23 ते 25 पर्यंत केला आहे. भाजपने दूध दरवाढीसाठी 2 वेळा राज्यव्यापी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्यामुळे ही दरवाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
करोना व्हायरसच्या अडचणीच्या काळात दुग्ध व्यवसायाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार आहे. सर्व दूध संघांनी केलेल्या दरवाढीबाबत समाधान व्यक्त करून हर्षवर्धन पाटील यांनी पुढे सांगितले की, दुधास रू. 30 दर मिळावा या मागणीवरती भाजप ठाम असून, शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. याआधी 17 ते 18 रुपये एवढा कमी दर मिळत असल्याने दूध खरेदी दरात वाढ करावी, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यामध्ये दि. 20 जुलै व 1 ऑगस्ट या दिवशी 2 वेळा राज्यव्यापी आंदोलन केले. भाजपच्या राज्यव्यापी दूध दरवाढ आंदोलनामुळे दूध दरवाढ निश्चितपणे मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. अखेर 11 सप्टेंबर पासून सहकारी व खासगी दूध संघांनी प्रतिलिटरला रू. 23 ते 25 पर्यंत दूध खरेदीचा दर वाढविला आहे.
शासनाने दुधास प्रति लिटरला 30 रुपये दर द्यावा, अतिरिक्त दुधाची शासनाने भुकटी करावी, दुधास प्रतिलिटर 10 रू. अनुदान द्यावे, या भाजपच्या मागण्या आजही कायम आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली.