नवी दिल्ली – बॉलिवुडचे ड्रग्ज कनेक्शन हा आता पूर्ण राजकीय विषय झाला असून त्यावरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप अद्याप थांबलेले नाही. भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि अभिनेता रवि किशन यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करत चित्रपट सृष्टीवर टीका केली होती. त्याला समाजवादी पक्षाच्या सदस्या जया बच्चन यांनी आक्षेप घेत प्रत्युत्तर दिले होते.
त्यानंतर आता समाजवादी पक्षाच्याच माजी खासदार आणि प्रख्यात अभिनेत्री जया प्रदा यांनी बच्चन यांना लक्ष्य केले आहे.
आता भाजपमध्ये असलेल्या जया प्रदा एका वाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, जया बच्चन आता एकदम जाहीरपणे बोलत आहेत. मात्र 2019 च्या निवडणुकीच्या वेळी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी आपल्या विषयी असभ्य टिप्पणी केली होती, त्यावेळी त्या गप्प का होत्या?
कोणत्याही विषयावर मत व्यक्त करणे चुकीचे नाही. मात्र एखाद्या विषयावर मौन साधणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. माझ्या विरोधात जेव्हा असभ्य भाषा वापरण्यात आली तेव्हा अनेकांनी त्याचा विरोध केला. मात्र जया बच्चन यांच्याकडून विरोधाचा एक शब्दही बाहेर आला नाही.
आताही कंगना रणावतच्या विरोधात जोरदार राजकारण करण्यात आले. मात्र जया बच्चन तिच्या बचावासाठी एक शब्दही बोलल्या नाहीत, अशी टीकाही जया प्रदा यांनी केली.