पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज (दि. 29) पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने शहरात भाजपने प्रभाग समित्यांवर पुन्हा एकदा मजबूत पकड केली आहे. फ प्रभागामध्ये समिती अध्यक्षपद निवडणुकीत भाजपमध्ये नाराज असलेल्या नगरसेवकांनी बंडखोरी करत फिल्डिंग लावली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभागाच्या अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध झाली. केवळ सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे त्यांच्या निवडीवर आज शिक्कामोर्तब झाले. परंतु, फ प्रभागात भाजपा नगरसेविका आश्विनी बोबडे यांनी बंडखोरी केली होती. महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. प्रभाग अध्यक्षांचा कार्यकाळ एक वर्षांचा असतो.
करोनामुळे अध्यक्षांना मुदतवाढ मिळाली होती. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अध्यक्षपदासाठी शुकवारी निवडणूक झाली. त्यासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत केवळ सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांचे अर्ज आले. विरोधातील राष्ट्रवादी कॉंग्रेसने अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
सत्ताधारी भाजपाकडून अ प्रभाग अध्यक्ष पदासाठी शैलेश मोरे, ब प्रभाग अध्यक्ष पदासाठी सुरेश भोईर, क प्रभाग अध्यक्ष पदासाठी राजेंद्र लांडगे, ड प्रभाग अध्यक्ष पदासाठी सागर अंगोळकर, इ प्रभाग अध्यक्ष पदासाठी विकास डोळस, ग प्रभाग अध्यक्ष पदासाठी अभिषेक बारणे, ह प्रभाग अध्यक्ष पदासाठी अंबरनाथ कांबळे यांचे एकमेव अर्ज आले होते.
अर्ज बाद होऊ नये यासाठी या सर्वांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यांच्या निवडीवर शुक्रवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले. तर, फ प्रभागात नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी देखील प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने कुंदन गायकवाड यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.