बेंगळुरू – कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाच्या प्रश्नावर अखेर भाजपने निर्णय घेतला असून या पदावर आर. अशोक यांची निवड करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणूका होऊन आज जवळपास सहा महिने या पदावरील नियुक्ती रखडली होती. पण आता मात्र तो प्रश्न भाजपने मार्गी लावला आहे.
दरम्यान, आर अशोक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, सरचिटणीस संतोष यांचे या निवडीबद्दल आभार मानले आहेत. याचवेळी त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सरकारवर टीका करताना म्हटले आहे की या सरकारने गेल्या सहा महिन्यात गरीबांसाठी काहींहीं केलेले नाही, त्यांनी दिलेल्या हमी फेल ठरल्या असून राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे.
आर अशोक हे पद्मनाभनगर मतदारसंघातील आमदार आहेत. कर्नाटकातील बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्येही त्यांनी महसूल खात्याची जबाबदारी सांभाळली होती. या वर्षी मे महिन्यात कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 135 जागांवर विजय नोंदवला आणि 224 जागांच्या विधानसभेत भाजपने 66 जागा मिळवल्या होत्या.