नवी दिल्लीे – सीएए कायदा, व एनआरसीच्या विरोधात शाहींनबाग येथे गेल्या 15 डिसेंबर पासून निदर्शने करणाऱ्या निदर्शकांविषयी भाजपचे खासदार परवेश वर्मा यांनी एक आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. शाहीनबागचे निदर्शक तुमच्या घरात शिरतील आणि बलात्कारही करतील असे त्यांनी म्हटले आहे.
शाहीनबाग निदर्शकांच्या विरोधात भाजपने सध्या आक्रमक मोहीम उघडली असून त्या अनुषंगाने रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर आदि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनीही या निर्शकांवर जोरदार टीका केली आहे.
दिल्लीच्या निवडणूकीत सीएए आणि त्यावरून होणारी निदर्शने हा भाजपने प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला आहे. खासदार परवेश वर्मा यांनी या निदर्शकांवर टीका करताना म्हटले आहे की, काश्मीरात काश्मीरी पंडितांशी जो व्यवहार झाला तोच प्रकार दिल्लीतही दिल्लीकर नागरीकांशी होण्याचा धोका आहे.
शाहीनबागेत सरकारच्या विरोधात हजारो निदर्शक जमले आहेत तेच आता तुमच्या घरात घुसतील आणि तुमच्या आयाबहिणींवर बलात्कार करून त्यांना ठार मारतील असे ते म्हणाले आहेत. या निदर्शकांच्या संबंधात आता दिल्लीतील लोकांनीच निर्णय घेतला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले आहे.