काबुल – तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानात हल्ल्यांचे सत्र सुरू केले असून त्यांनी उत्तरेकडील एका अफगाणि पोलिस ठाण्यावर हल्ला करून अकरा पोलिस कर्मचाऱ्यांना ठार मारले आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी हा हल्ला केला. हा हल्ला पोलिसांमधीलच तालिबानच्या काहीं हस्तकांच्या मदतीने झाला असल्याचे सांगण्यात येते. तेथे हल्ला करण्यासाठी आलेल्या गनिमांना त्यांच्या काही हस्तकांनीच पोलिस ठाण्याचे सुरक्षा गेट उघडून आत प्रवेश दिला. त्यामुळे त्यांना हा हल्ला करणे सोपे गेले.
तालिबानी गनिमांकडून अमेरिकन आणि नाटो फौजांना नेहमी लक्ष केले जाते पण त्या प्रकारांमध्ये या फौजांची मोठी जीवित हानी होत नाही. पण तालिबानी गनिम अफगाणी फौजांनाच जेव्हा लक्ष्य करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते कारण या फौजांमधील तालिबानी हस्तकच हल्लेखोरांना मदत करीत असतात. सध्या तालिबान आणि अमेरिका यांच्यात शांतता बोलणी सुरू आहेत आणि त्यांच्यातील समझोता करार टप्प्यात आला असतानाच पुन्हा हे हल्ले सुरू झाल्याने त्याचा शांतता करारावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे सांगण्यात येते.