Shrikant Shinde । भाजपने नुकतीच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. या यादीमध्ये अनेक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार यांना तिकीट देण्यात आले त्यामुळे महायुतीतील अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी यांनी नाराजी दर्शवली आहे.
या दरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा आहे. अशात महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची शिंदे गटाकडून चर्चा आहे. तर दुसरीकडे शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाने ही कल्याण लोकसभेला टार्गेट करत श्रीकांत शिंदेंच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे.
अशात मागील काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघ हा भाजपला मिळावा अशी कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली सुरु झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप पक्षाची दिवा शहरात नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने यावेळी कल्याण लोकसभा निवडणुक ही भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, असा निर्णय घेतला आहे. तसेच पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आलं आहे. या पत्राद्वारे कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो पण चिन्ह मात्र कमळच असो अशी आम्ही मागणी करण्यात आली आहे. यामुळे आता कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा बनत चालला आहे.
Shrikant Shinde । उद्धव ठाकरें म्हणाले होते की…
‘संपूर्ण देशात कल्याण लोकसभेवरती एक वेगळी जबाबदारी आहे. आमच्यावर घराणेशाहीवरून टीका केली. मात्र टीका करणारे घरंदाज पाहिजेत. कल्याण लोकसभेत गद्दार यांच्या घराणेशाही थांबवायची जबाबदारी आहे. ‘