महापालिकेकडून भोजन व्यवस्था बंद हाेताच चमकाेगिरी ‘भाजपाई गायब’

पिंपरी – लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या गोरगरिबांना जेवण पुरविण्याची व्यवस्था महापालिकेने केली. मात्र महापालिकेच्या व्यवस्था असताना आपण स्वत:च हे भोजन वाटत असल्याचा आव आणत सोशल मीडियावर चमकोगिरी करणारे गायब झाले आहेत. महापालिकेने धान्य आणि साहित्याचा पुरवठा बंद केल्यानंतर यांची कम्युनिटी किचनही बंद झाली असून, यामध्ये आघाडीवर असलेल्या भाजपाच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी जेवण बंद केले आहे. त्यामुळे स्वखर्चाचा दावा करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

21 मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर झाल्यामुळे शहरातील सर्वच उद्योगधंद्यापासून व्यवसाय व उलाढाल ठप्प झाली होती. हातावरचे पोट असणाऱ्यांचे काम गेल्यामुळे शहरातील गोर-गरीब, मजूर, हातगाडीवाल्यांसह अनेक जण अडचणीत आले होते. यामध्ये ग्रामीण भागातून कामासाठी आलेले व परप्रांतीय मजुरांचा मोठा समावेश होता. या नागरिकांची अडचण ओळखून महापालिकेने या गरिबांना जेवण मिळावे या उद्देशाने कम्युनिटी किचन 27 एप्रिलपासून सुरू केली होती.

त्यासाठी राज्यशासनाने महापालिकेला तांदूळ आणि गहू उपलब्ध करून दिला होता. तर महापालिकेने प्रभाग स्तराहून गॅस, तूरडाळ, मसाला व तेल उपलब्ध करून दिले होते. महापालिकेने संपूर्ण खर्च उचलला होता. तर राजकीय अथवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यवस्था उपलब्ध केली होती. मात्र काही महाशयांनी कम्युनिटी किचनमधून उपलब्ध होणारे भोजन हे आम्ही स्वखर्चाने उपलब्ध करून देत असल्याचा आव आणत आपल्या फेसबूकपासून सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते. तर कम्युनिटी किचनच्या ठिकाणी फ्लेक्‍सबाजी व पोस्टरबाजी केली होती.

लॉकडाऊन चारमध्ये प्रवासाला परवानगी देण्यात आल्यामुळे परप्रांतीय आणि राज्यातील ग्रामीण भागातून आलेले मजूर आपआपल्या गावी गेले. महापालिकेत झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीतही भोजन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर महापालिकेने कम्युनिटी किचन व भोजन व्यवस्था बंद करत साहित्यही देणे बंद केले. ज्या दिवशी साहित्य बंद झाले त्याच दिवसापासून स्वखर्चाचा आव आणून भोजन वाटणारेही गायब झाले. तर फेसबुकवरील चमकोगिरीही बंद झाली. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये या चमकोगिरी करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.

रोजगार मिळू लागल्याने भोजन व्यवस्था बंद – खोत
पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन चारमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. शहरातील बहुतांश व्यवसाय, व्यवहार व उद्योगही सुरू झाल्यामुळे नागरिकांना रोजगार मिळू लागला आहे. तर परप्रांतीय आणि ग्रामीण भागातील मजूर गावी गेल्यामुळे पालिकेमार्फत सुरू असलेले कम्युनिटी किचन बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्‍त संदीप खोत यांनी दै. प्रभात’शी बोलताना दिली.

ठराविक ठिकाणी भोजन व्यवस्था
फेसबुकसह सोशल मीडियावर चमकोगिरी न करणाऱ्या भाजपाच्या काही राजकीय नेते व सामाजिक संस्थांकडून आजही भोजन पुरविले जात आहे. पोस्टरबाजी न करता सामाजिक दायित्वातून ज्यांनी काम सुरू केले आहे, त्या बोटावर मोजण्याएवढ्या व्यक्तींकडून सुरू असलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.