मुंबई: बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोलाची मदत करत आहे. आतापर्यंत हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे. या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे संजय राउत यांनी सामनात सोनू सूदच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे राज्यात हा विषय चांगलाच चर्चेत आला.
“भाजपने सुद्धा राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे ‘राऊत यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोना रुग्णांना महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये जागा नाही म्हणून लोक घरी तडफडून मरत आहेत. प्रत्येक घरात उपासमार सुरू आहे. अशा वेळी तुम्ही गरिबाला एका पैशाची मदत केली नाही. दुसरे करतात त्यांना तरी करू द्या.
स्वतःही करायचं नाही सोनू सूद सारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत असतील त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर संजय राऊत टीका करतात , हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म ?” असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत म्हणाले, लॉकडाउनदरम्यान अचानक सोनू सूद नावाचा एक महात्मा तयार झाला. इतक्या लवकर एखाद्याला महात्मा बनवले जाऊ शकते? प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी लागणाऱ्या पैशांवरही प्रश्न उपस्थित करत, सोनू सूदला भाजपचा मुखवटा म्हटले आहे.