हैदराबाद – तेलंगणा सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप त्या राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी रविवारी केला. आमचे 20 ते 30 आमदार फोडण्यासाठी दिल्लीतील मध्यस्थांनी प्रत्येकी 100 कोटी रूपयांची ऑफर दिल्याचा दावाही त्यांनी केला.
तेलंगणातील 4 आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून नुकतीच तिघांना अटक करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर, विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचार सभेत बोलताना केसीआर यांनी भाजपवर निशाणा साधला. फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा दाव्याशी संबंधित चारही आमदारांनी केसीआर यांच्या सभेला हजेरी लावली. त्या आमदारांची केसीआर यांनी प्रशंसा केली.
भूमिपुत्र असणाऱ्या आमदारांनी प्रचंड पैशांची ऑफर धुडकावली. अशाच नेत्यांची राजकारणात खरी गरज आहे. आमदारांची खरेदी करण्यासारखे प्रकार समाजासाठी चांगले आहेत का, या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे. आमदारांना ऑफर करण्यात आलेला पैसा कुणी पुरवला? त्यामागे कोण आहे याची चौकशी व्हायला हवी, असे केसीआर म्हणाले.
भाजपचा पलटवार
केसीआर यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपने त्यांच्यावर पलटवार केला. भाजपचा कुठला नेता ऑफर घेऊन तुमच्या आमदारांकडे गेला का? आमच्याकडे एवढा पैसा आहे तरी का? प्रत्येकी 100 कोटी रूपये देण्याइतके तुमचे आमदार महान आहेत का? तुमचे सरकार पाडण्यात आम्हाला कुठलाही रस नाही. तसा आरोप करून तुम्हाला सहानुभूती मिळवायची असावी, अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली.