गृहिणींना वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करण्याची हौस असतेच. मात्र, तरला दलाल यांनी त्यास व्यावसायिक रूप देऊन नवीन कीर्तिमान प्रस्थापित केला. त्यांनी केवळ खाद्यपदार्थांवर पुस्तकच लिहिली नाहीत तर भारतीय पारंपरिक पदार्थ तयार करण्याच्या कौशल्याचे यशस्वी उद्योगात रूपांतर केले. मऊ इडली असो किंवा मेक्सिकन रैप असो असे असंख्य पदार्थ तरला दलाल यांनी सहजपणे तयार केले. या जोडीला त्यांनी अनेकांना खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी प्रेरित केले. तरला दलाल यांच्यावर बायोपिक येत असून त्याचे नाव देखील तरला असेच आहे. त्यांची भूमिका अभिनेत्री हुमा कुरेशी साकारत आहे. तरला दलाल यांच्या आयुष्यातील चढउतार आणि पाककलेत
सर्वोच्च शिखर गाठण्यापर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.
तरला दलाल यांचा जन्म पुण्याचा. 1960 मध्ये त्यांचा विवाह मुंबईचे नलिन यांच्याशी झाला. त्या मुंबईला स्थलांतरित झाल्या. लहानपणापासूनच त्यांना वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची हौस आणि आवड होती. 1966 मध्ये त्यांनी याच आवडीला नवीन दिशा देण्याचे ठरविले. शेजारी राहणाऱ्या महिलांसाठी त्यांनी कुकिंगचे क्लास सुरू केले. या क्लासमध्ये थाय डिशपासून मेक्सिकन, इटालियन आणि भारतीय खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. लोकांना त्यांची रेसिपी खूपच आवडली आणि लोकप्रियता वाढत गेली.
कालांतराने बऱ्याच महिला तरला दलाल यांच्या क्लासमध्ये येण्यासाठी गर्दी करू लागल्या. वाढती लोकप्रियता पाहता वकिल अँड सन्स या प्रकाशन संस्थेने त्यांचे पहिले कुकबूक प्रकाशित करत असताना करारही केला. “द प्लेअर ऑफ व्हेजिटेरियन कुकिंग’ असे त्या पुस्तकाचे नाव. 1974 मध्ये प्रकाशित या पुस्तकात इंडियन, चायनीज, पाश्चिमात्य शाकाहारी रेसिपीचा समावेश होता. या पुस्तकाचे अनेक भारतीय भाषेत हिंदी, गुजराथी, मराठी, बंगाली त्याचबरोबर डच आणि रशियनसारख्या परकी भाषेत अनुवाद करण्यात आला. या पुस्तकामुळे त्यांना अनेक पुस्तके लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली.
दलाल यांनी रेसिपीवर आधारित सुमारे 170 पुस्तके लिहिली. तरला दलाल फूड्स (टीडीएफ) नावाच्या ब्रॅंड अंतर्गत “रेडी टू कूक मिक्स’ ची एक श्रेणी लॉंच केली. ठाण्यातील अंबरनाथ येथे एका कारखान्यात 18 पेक्षा अधिक प्रकारचे इन्स्टंट मिक्स तयार होऊ लागले. 2013 मध्ये कॉर्न प्रॉडक्टस् कंपनी लिमिटेडने हा कारखाना चालविण्यास घेतला. तरला दलाल यांनी गृहिणींमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची रुची वाढविली. त्याची दखल घेत 2007 मध्ये तरला दलाल यांना पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आले.
17 हजार खाद्यपदार्थांच्या रेसिपीसह त्यांनी संकेतस्थळही सुरू केले. यात आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांच्या सर्व शाकाहारी रेसिपींचा समावेश आहे. त्यांनी कुकिंग अँड मोअर नावाचे द्वैमासिकही काढले. दूरचित्रवाणीवर कुकिंग होस्ट देखील केले. 2013 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी तरला यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी तब्बल चार दशकं पाककलेची साधना केली.
अवंती कारखानीस