इस्लामाबाद – पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना 24 तासांत राजीनामा देण्याची सूचना केली आहे. इम्रान खान यांनी राजीनामा देऊन नॅशनल ऍसेम्ब्ली बरखास्त केली पाहिजे अन्यथा त्यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे पदच्युत केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
लालमुसा येथील अवामी मार्चच्या उपस्थितांना संबोधित करताना भुट्टो म्हणाले की, इम्रानखान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ सरकारचे पार्सल लोकशाही मार्गाने त्यांच्या घरी पाठवले जाईल. ते म्हणाले की, विरोधकांच्या आक्रमक भुमिकेवरून इम्रानखान इतके घाबरले आहेत की त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना शिव्या देणे आणि त्यांना जाहीर दूषणे देण्याचे काम आता सुरू केले आहे. त्यांच्यातील हताशपणाचेच हे लक्षण आहे असे त्यांनी म्हटले आहे.
इम्रानखान सरकार आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यातील कथित संबंधाचा संदर्भ देत ते म्हणाले की, देशाने आपली सारी आर्थिक धोरणे गुंडाळून ठेवली आहेत आणि त्यांनी नाणेनिधीपुढे शरणांगती पत्करली आहे. देशात उद्भवलेले सध्याचे आर्थिक संकट केवळ इम्रानखान सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच उद्भवले आहे असा आरोपही त्यांनी केला.