इस्लामाबाद – पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी बुधवारी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी 33 वर्षीय बिलावल यांना आयवान-ए-सदर (राष्ट्रपती भवन) येथे एका साध्या समारंभात शपथ दिली. बिलावल यांनी गेल्या आठवड्यात लंडनमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे प्रमुख नवाझ शरीफ यांची भेट घेतल्यानंतर सुमारे एक आठवड्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
11 एप्रिल रोजी सत्तेवर आलेल्या विद्यमान आघाडी सरकारमधील पाकिस्तान पीपल्स पार्टी हा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. बिलावल हे माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे चिरंजीव आहेत. या आधीच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला नव्हता त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण अखेर त्यांचा मंत्रिपदाचा विषय मार्गी लागला आहे.