नवी दिल्ली – फ्रान्स आणि अमेरिकेबरोबर भारताने द्विपक्षीय विमानसेवा करार केला आहे. यानुसार या दोन्ही देशांमधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार आहेत, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज सांगितले. अशाच प्रकारची योजना जर्मनी आणि ब्रिटनमधून सुरू करण्यासाठीही लवकरच परवानगी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या करारानुसार एअर फ्रान्स दिल्ली, मुंबई, बेंगळूरु आणि पॅरिसमधून 18 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान 28 विमानांचे उड्डाण करेल. तर अमेरिकेतील युनायटेड एअरलाईन्सची 18 विमान उड्डाणे 17 जुलै ते 31 जुलै दरम्यान भारत- अमेरिकेदरम्यान आयोजित केली जातील.
युनायटेड एअरलाईन्सची सध्या दिल्ली आणि न्यूयॉर्कदरम्यान दैनंदिन आणि दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्कोदरम्यान आठवड्यातून तीनवेळा विमानसेवा सुरू आहे, असेही पुरी यांनी सांगितले.
नवीन उपक्रमानुसार ब्रिटनवरूनही आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केली जाईल. त्याअंतर्गत दिल्ली आणि लंडनवरून दिवसाला दोन विमाने सोडली जातील. जर्मनीकडूनही अशा उपक्रमाची विचारणा झाली असून ल्युथियान्साबाबतची व्यवस्था पूर्ण होत आली आहे. त्यांच्या विनंतीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही पुरी म्हणाले.