नोएडा. (उत्तर प्रदेश): मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अबू सालेमच्या बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित व्यवसायासाठी दिल्लीत काम करणाऱ्या एका हस्तकाला बुधवारी रात्री मुंबईमध्ये अटक करण्यात आली. गुरुवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
गजेंद्र सिंह असे अटक करण्यात आलेल्या हस्तकाचे नाव असोन तो कुख्यात गॅंगस्टर खान मुबारकचा निकटचा साथीदार आहे. त्याला “स्पेशल टास्क फोर्स’च्या नोएडा युनिटच्यावतीने बुधवारी रात्री मुंबईमध्ये अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गजेंद्र सिंह याने मालमत्ता विषयक एका प्रकरणात दिल्लीतील एका व्यवसायिकाकडून 1.80 कोटी रुपये घेतले होते. जेंव्हा हे पैसे परत मागितले गेले तेंव्हा सिंहने खान मुबारकच्या साथीदारांकरवी नोएडातील सेक्टर 18 मध्ये या व्यवसायिकावर गोळीबार केला होता, असे “एसटीएफ’चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राज कुमार मिश्रा यांनी सांगितले. गोळीबार करणाऱ्यांना सिंह यानेच 10 लाख रुपये दिले होते. या आर्थिक व्यवहाराचा छडा “एसटीएफ’ने लावला असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
गजेंद्र सिंहने अबू सालेम आणि खान मुबारक यांचेही पैसे दिल्ली आणि राजधानी परिसरातील मालमत्तांमध्ये गुंतवले होते. नोएडा परिसरातील पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेल्या काही प्रकरणांमध्येही सिंह वॉन्टेड होता. या प्रकरणांच्या तपासासाठी त्याला तेथेच ठेवण्यात आले आहे.