नवी दिल्ली – मुडिज् इन्व्हेस्टर सर्विसेस या पतमानांकन करणाऱ्या संस्थेने अदानी समूहातील चार कंपन्यांचे पतमुल्यांकन स्थिर या पातळीवरून नकारात्मक या पातळीवर केले आहे. गेल्या 15 दिवसात अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने अदानी समूहावर गैरप्रकाराचे आरोप केल्यानंतर शेअर बाजारात अदानी समूहातील कंपन्याच्या शेअरची विक्री चालू आहे.
या पार्श्वभूमीवर मुडिज् इन्व्हेस्टर सर्व्हिसेस या संस्थेने अदानी समूहातील कंपन्यांचे मानांकन कमी केले आहे. ज्या कंपन्यांचे मानांकन कमी करण्यात आले आहे, त्यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी रेस्ट्रिक्टेड ग्रुप, अदानी ट्रान्समिशन, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई या कंपन्यांचा समावेश आहे.
अदानी घेणार कायदेशीर सल्ला
अदानी समूहाने हिंडेनबर्ग अहवालाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील वॉचटेल या कायदेशीर सेवा देणाऱ्या कंपनीच्या सेवा घेतल्या असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी मूहावर केलेले आरोप चुकीचे आहेत असे अदानी समूहाने या अगोदर सांगितले आहे.
दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने आपण केलेले आरोप संशोधनावर आधारित आहेत आणि आपल्या संदर्भात समाज माध्यमात चुकीचे वृत्त पसरविले जात असल्याचा आरोप केला आहे. आपल्यावर अमेरिकेत बंदी घातली होती असे वृत्त माध्यमातून पसरविले जात आहे. या वृत्तात तथ्य नसल्याचे हिंडेनबर्गर सरचने म्हटले आहे.
दरम्यान, अदानी समूहातील काही कंपन्यांच्या शेअर बाबत एमएससीआय या संस्थेने नकारात्मक मूल्यांकन केल्यामुळे आज या समूहातील बहुतांश कंपन्यांच्या शेअरचे भाव चार टक्क्यापर्यंत कोसळले. या समूहातील 10 कंपन्यापैकी आठ कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले तर दोन कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. यामुळे शुक्रवारी या समूहातील कंपन्यांचे बाजार मूल्य 3.3 टक्क्यांनी कमी झाले. हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने आरोप केल्यापासून म्हणजे 24 जानेवारीपासून अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरची एकतर्फी विक्री झाल्यामुळे या कंपन्यांचे बाजार मूल्य 51 टक्क्याने कमी झाले आहे.
शुक्रवारी अदानी एंटरप्राइजेस कंपनीचा शेअर चार टक्क्यांनी कोसळल्यामुळे या कंपनीचे बाजार मूल्य 9,000 कोटी रुपयांनी कमी होऊन 2.10 लाख कोटी रुपये झाले. अदानी पावर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस या कंपन्यांचे शेअर 5% पर्यंत कोसळले. त्याचबरोबर एनडीटीव्ही, एसीसी, अदानी विल्मर या कंपन्यांना विक्रीचा फटका बसला. मात्र अंबुजा सिमेंट व अदानी पोर्टस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.