Anantkumar Hegde । Lok Sabha Election 2024 – भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत लोकसभेच्या ३०२ उमेदवारांची घोषणा केली आहे. कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यात पक्षाने मोठा बदल केला असून पक्षाचे हिंदुत्वाचे पोस्टर बॉय मानले जाणारे अनंत कुमार हेगडे यांचे तिकिट कापण्यात आले आहे.
त्याउलट २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या दोन उमेदवारांना खासदाकरीचे तिकीट देण्यात आले आहे.
विधानसभेत पराभव झाल्यावरही रिंगणात उतरवण्यात आलेल्यांमध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा समावेश आहे.
अनंत कुमार हेगडे यांचे तिकिट कापणे ही सगळ्यांत धक्कादायक बाब ठरली आहे. ते पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या जागी विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्यावर पक्षाने विश्वास दर्शवला आहे. हेगडे आणि कागेरी हे दोन्ही ब्राह्मण आहेत.
निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कर्नाटकात कट्टर हिंदुत्वाचे कार्ड खेळले जाते आणि हेगडे या राज्यात भाजपचे पोस्टर बॉय राहीले आहेत. १९९० मध्ये रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी कर्नाटकच्या राजकारणात त्यांचा उदय झाला.
…म्हणून कापले तिकीट?
अलिकडेच हेगडे यांनी एक वादग्रस्त विधान करून पक्षाला अडचणीत आणले होते. लोकसभेत भाजपने ४०० जागा जिंकल्या पाहिजेत असे ते म्हणाले होते. लोकसभेत तर आमच्याकडे बहुमत आहे, मात्र राज्यसभेत नाही. आणि घटनेत बदल करायचा असेल तर आम्हाला चारशे जागा जिंकाव्या लागतील असे त्यांनी म्हटले होते.