नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी शारदा मनी लॉंड्रिंग प्रकरणात नलिनी चिदंबरम, माजी माकप आमदार देवेंद्रनाथ विश्वास आणि इतरांची मालमत्ता जप्त केली आहे. नलिनी चिदंबरम या कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या पत्नी आहेत.
“शारदा मनी लॉंड्रिंग प्रकरणामध्ये नलिनी चिदंबरम, बिस्वास आणि आसामचे माजी मंत्री दिवंगत अंजन दत्ता यांच्या व शारदा समुहाच्या मालकीची 3.30 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 3 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा ताप्तुरता आदेश, मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जारी करण्यात आल्याचे, ईडीने म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय?
सदर, मनी लॉंड्रिंग प्रकरण 2013 मध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशामधील शारदा समूहाने केलेल्या कथित चिट फंड घोटाळ्याशी संबंधित आहे. ज्यामध्ये नलिनी, बिस्वास, देबब्रत सरकार आणि दत्ता यांच्या मालकीच्या अनुभूती प्रिंटर्स अँड पब्लिकेशन्सचा सामावेश आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, “या समूह कंपनीने उभारलेली एकूण रक्कम सुमारे 2,459 कोटी रुपये इतकी आहे, त्यापैकी सुमारे 1,983 कोटी रुपये व्याजाची रक्कम वगळून ठेवीदारांकडे अद्यापही थकबाकी आहे.’ अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात आतापर्यंत 600 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.