पुणे – नेहमी वैविध्यपूर्ण कथा, विषय मांडणारे अशी लेखक-दिग्दर्शक ‘महेश मांजरेकर’ यांची सिनेसृष्टीत ओळख आहे. त्यांनी सिनेव्यवसायाची गरज म्हणून व्यावसायिक सिनेमे बनवले; पण समाजातील वास्तविकता पडद्यावर प्रतिबिंबित करणारे मार्मिक सिनेमेही त्यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केले.
आता पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवणारा एक सिनेमा ते घेऊन येत आहेत. “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं या सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्या शुक्रवारी म्हणजेच, दि. १४ जानेवारी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
सिनेमातील काही दृश्यांवर टीका झाली असून, राष्ट्रीय महिला आयोगानेही या दृष्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच, त्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेची आक्षेपार्ह स्थितीमधील दृश्य दाखवण्यात आली होती.
यावर आता लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीच यासंदर्भात जाहीर निवेदन दिलं आहे. यामध्ये महेश मांजरेकरांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.
महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली, ‘या चित्रपटाच्या प्रोमेमधील काही दृष्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला तरी कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. समाजातून उमटणाऱ्या भावनांचा मान राखत आम्ही या चित्रपटाच्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी सर्व दृष्ये काढून टाकली आहे. तसेच हा प्रोमो सर्व ठिकाणांवरून काढण्यात आला असून सुधारित प्रोमो सर्वांना पाठवण्यात आला आहे. ‘ आक्षेपार्ह दृष्ये ही केवळ प्रोमोमधूनच नाही तर चित्रपटामधून देखील वगळण्यात आल्याचे महेश मांजरेकरांनी सांगितले आहे.