पुणे – आगामी काळात परीक्षार्थींची ने-आण करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाने उचलली आहे. यासाठी ऑक्टोबरमध्ये विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.
ऑक्टोबरमध्ये राज्यातील विविध केंद्रांवर “एमएचटी सीईटी’ आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकडून (एसटी) परीक्षार्थींची ने-आण करण्यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आहे. पुणे विभागातून परीक्षांच्या तारखांतून दोन सत्रांत बसेस सोडण्यात येणार आहेत.
मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावर संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा 4 ऑक्टोबर रोजी सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा दोन सत्रांत 38 उपकेंद्रांवर होणार आहेत. त्यासाठी दि.3, 4, 5 आणि 11 ऑक्टोबर या कालावधीत केंद्रावर परीक्षार्थींसाठी पुणे विभागातून बसेस सोडण्यात येणार आहेत. तर दि.1 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात 180 केंद्रांवर एमएचटी-सीईटी होणार आहे. यासाठी देखील दोन सत्रांत बसेस धावणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझर या सर्व सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करून रा.प. महामंडळामार्फत आवश्यकतेनुसार सेवा पुरवली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी लांब पल्ला आणि मध्यम पल्ल्यांच्या फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.