नवी दिल्ली : भविष्यातील सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मिरच्या आकाशात मिग-29 गस्त घालणार आहे. जम्मू आणि काश्मीर सारख्या भागात संरक्षण परिस्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने हवाई दलाने श्रीनगर विमानतळावर प्रगत मिग-29 लढाऊ विमानांचा एक स्क्वॉड्रन तैनात केला असल्याची माहिती समोर येत आहे. हवाई दलाच्या या निर्णयामुळे आपल्या शत्रू राष्ट्रांची झोप उडणार असल्याचे म्हटले जात आहे.
जम्मू-काश्मीर पाकिस्तान आणि चीनच्या सीमेला लागून असल्याने त्याठिकाणच्या एअरबेसवर लढाऊ विमाने तैनात करण्याचा विचार मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होता. भारताच्या पाकिस्तानच्या उत्तरेकडील सीमेचे रक्षण करणारे ट्रायडंट स्क्वॉड्रन श्रीनगरमधील या तळावर तैनात करण्यात आले आहे. ट्रायडंट्स स्क्वॉड्रनला सैन्यात ‘उत्तरचे रक्षक’ असेही म्हणतात.
काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर हवाई दलाच्या बेसवर आता मिग-29 ही लढाऊ विमाने सज्ज करण्यात आली आहेत. या एअरबेसवर आतापर्यंत मिग-21 विमाने सज्ज होती. त्यामुळे आता चिनी हालचालींवर मिग-29 विमानांची नजर राहणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालकोटमध्ये एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला झटका दिला होती. त्यानंतर पाकिस्तानने एफ-16 विमानांनी भारतावर हल्ल्याच प्रयत्न केला होता. मात्र, मिग-21 विमानांनी एफ-16 विमानांचा हल्ला परतावून लावला होता. या मिग-21 विमानांची जागा आता मिग-29 विमानांनी घेतली आहे. तत्पूर्वी मिग-29 विमानांच्या प्रणालीत अनेक बदल करून त्यांचं नामकरण उन्नत मिग-29 यूपीजी असे करण्यात आले आहे.
भारतीय वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर विपुल शर्मा यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘काश्मीर खोऱ्यात असलेल्या श्रीनगर एअरबेसची उंची मैदानी भागापेक्षा जास्त आहे. इथे दोन्ही चीन आणि पाकिस्तान देशांची सीमाजवळ आहे, अशा परिस्थितीत अल्पावधीतच वेगवान प्रतिसाद देणार्या विमानांची गरज होती. मिग-29 हे विमान यासाठी योग्य आहे. कारण त्यामध्ये या परिस्थितीसाठी उत्तम विमान आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं आहेत.
त्यासोबतच मिग-29 मध्ये संघर्षाच्या वेळी शत्रूच्या लढाऊ विमानांना ठप्प करण्याची क्षमताही आहे. हे विमान रात्री उड्डाण करताना लष्कराच्या महत्त्वाच्या ऑपरेशन्स करण्यास सक्षम असल्याचे हवाई अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मिकोयान मिग-29 हे सोव्हिएत युनियनमध्ये डिझाइन केलेलं दुहेरी इंजिन असलेलं लढाऊ विमान आहे. हे मिकोयान डिझाईन ब्युरोने 1970 च्या दशकात हवाई श्रेष्ठता लढाऊ विमान म्हणून विकसित केले होते.