मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर दाखल असलेल्या सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्याशी संबंधित प्रकरणांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
राज्यात सत्तेत असलेल्या महविकास आघाडीला हा मोठा झटका मानला जात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंग यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. त्यांच्या याच आरोपांनंतर देशमुख यांना खुर्ची सोडावी लागली होती. यानंतर परमबीर सिंग विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळाला होता.
अशातच आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले असून यावेळी परमबीर सिंग यांच्याशी संबंधित सर्व प्रकरणांची माहिती आठवड्याभरात सीबीआयकडे द्यावी असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.