पणजी – गोव्यात कॉंग्रेसला आणखी एक दणका बसला आहे. या पक्षाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री रवि नाईक यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे गोव्यातील कॉंग्रेस आमदारांची संख्या आता केवळ तीन वर आली आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात लुईझिन्हो फालेरिओ यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन तृणमुल कॉंग्रेसचा रस्ता धरला होता. अर्थात रवि नाईक यांनी मागच्याच वर्षी भाजप मध्ये प्रवेश केला होता. पण तांत्रिकदृष्ट्या ते कॉंग्रेसचे सदस्य होते.
आपण आपला पुढील राजकीय निर्णय लवकरच जाहीर करू असे त्यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितले. ते गोव्याच्या फोंडा मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले होते. सन 2017 साली झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला होता.