वॉशिंग्टन – महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील “स्थगिती सरकारचा’ पुढचा भाग आता अमेरिकेत पहायला- अनुभवायला मिळणार आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विविध प्रस्तावांना स्थगिती देण्याच्या मन:स्थितीमध्ये आहेत. बायडेन 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष कार्यालय अर्थात व्हाइट हाऊसची सूत्रे हाती घेतील. पहिल्या दहा दिवसांत ट्रम्प यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त निर्णय बदलून नवी अमेरिका उभी करण्याच्या अनेक प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवण्याची तयारी केली आहे.
“व्हाइट हाऊस’चे नवे चीफ ऑफ स्टाफ रोन क्लीन म्हणाले, बायडेन कार्यकाळाच्या पहिल्या दिवशी देशासमोर चार मोठी आव्हाने आहेत. कोरोना महामारी, आर्थिक संकट, पर्यावरणासंबंधी संकट व वंशभेदाशी तोंड देण्यासाठी सुमारे एक डझन प्रस्तावांवर स्वाक्षरी करतील. अमेरिकेला पुन्हा पॅरिस करारामध्ये समाविष्ट करणे, सात इस्लामिक राष्ट्रांवरील प्रवास निर्बंधांना रद्द करणे हे प्रस्ताव असतील.
एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने संपूर्ण देशात सशस्त्र, सामान, सुरक्षात्मक उपकरणांच्या जाहिरातींवर तत्काळ बंदी लागू केली आहे. हे निर्बंध बायडेन यांच्या शपथ समारंभाच्या दोन दिवसांनंतरही लागू राहतील. आम्ही आधीपासूनच शस्त्र, दारूगोळा इत्यादी जाहिरातींवर निर्बंध लागू केले आहेत. आता आम्ही शस्त्रांच्या सहायक उपकरणांच्या जाहिरातींवर बंदी घालणार आहोत, असे या सोशल मीडियाने सांगितले.
बुधवारी वॉशिंग्टन डीसीमध्ये बायडेन यांच्या शपथ समारंभात सशस्त्र लोक हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे, असा इशारा एफबीआयने दिला आहे. त्याला तोंड देण्यासाठी राजधानीचे रूपांतर छावणीत करण्यात आले. 25 हजारांहून जास्त नॅशनल गार्डसची तैनाती करण्यात आली आहे. कॅपिटल हिल्सवरील हिंसाचारानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. शपथ समारंभाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या दिवसाचा अजेंडा
1. महामारीमुळे आर्थिक तंगीचा विचार करून सामान्य तसेच विद्यार्थी यांच्या कर्जफेडीची मुदत वाढवण्यात येणार आहे.
2. सार्वजनिक ठिकाणी व आंतरराज्य प्रवासादरम्यान मास्क अनिवार्य करणे.
3. घुसखोरीमुळे वेगळे झालेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घालून देणे.
4. छोट्या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी 1.9 लाख कोटी डॉलरच्या (138 लाख कोटी रुपये) पॅकेजला मंजुरी मिळवणे.