पुणे (हर्षद कटारिया) – गुलटेकडी औद्योगिक वसाहत येथे सायकल दुरुस्तीचे दुकान चालविणारे श्रीधर काळे यांच्या मुलाने न्यायाधिश होण्यासाठीच्या परिक्षेमध्ये यश मिळवले आहे. अँड. रवि श्रीधर काळे असे त्यांचे नाव आहे. नुकतेच न्यायाधीश परीक्षेच्या निकालात त्यांची निवड झाली. एक वर्षाच्या ट्रेनिंग नंतर त्यांना न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. गरिबीमुळे आयुष्यात जगण्याची, पोट भरण्याची लढाई तिव्र असते, अश्या बिकट परिस्थितीवर मात करत यश संपादित करत रवि काळे यांनी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील नागिरकांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.
अँड. रवी काळे यांचे वडिल मूळचे अहमदनगर येथील श्रीगोंदा गावचे राहणारे आहेत. पोट भरण्यासाठी 1968 साली पुण्यात गुलटेकडी वसाहतमध्ये राहण्यास आले. रोजगार म्हणून चहाची टपरी सुरू केली. त्यानंतर वसाहतमध्ये सायकल दुरुस्ती चे काम सुरू केले. तीन मुले व दोन मुलींना सांभाळताना त्यांच्या पत्नीचे 2005 साली निधन झाले. मात्र खचून न जाता त्यांनी पाचही मुलांना उच्च शिक्षित केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक महानगरपालिकाच्या संत नामदेव शाळेत पूर्ण केले.
स्वतःच्या परिवारासोबतच सामाजिक कामाची आवड असलेल्या श्रीधर काळे यांनी वसाहतीमधील मुलांना गैरमार्ग, व्यसने, भांडणे यांच्या पासून दूर ठेवण्यासाठी काम केले. सामोपचाराने तंटे सोडविण्याचा त्यांचा आदर्श अनुकरण करत आज त्यांचा मुलगा न्यायाधीश होण्याची परीक्षा पास झाला आहे. पत्र्याच्या घरात राहून जिद्द व मेहनतीने यश संपादन करता येते, हे काळे यांच्या यशातून दिसून आले आहे.
लहानपणी आईने रवि यांना मोठा जज हो, ‘रवि लई सन्मान मिळल’ असे म्हटले होते. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर आईची स्वप्न पूर्ती केल्याचा आनंद वाटतो, असे सांगत रवि काळे भावुक झाले. वकिल होताच पहिल्या वर्षी सायकलवर न्यायालयात गेलो, ज्येष्ठ अँड. प्रताप परदेशी यांनी केलेली मदत व मार्गदर्शनामुळे माझ्यातील न्यूनगंड नाहीसा झाला. वडिल, नातेवाईक, वकिल मित्र संतोष चव्हाण व श्रीनिवास मोरे यांनी केलेली मदत मोलाची ठरली, असेही रवि काळे म्हणतात.
तुम्ही कोठे राहता हे महत्वाचे नाही, यश संपादन करण्यासाठी मेहनतीसोबत चांगल्या संस्काराची गरज असते, आणि यशाचा आनंद घेण्यासाठी नातेवाईक व मित्र परिवाराच्या सोबतीची गरज असते, असेही ते सांगतात.
वसाहतीमधील युवकांनी रवि काळे यांचा आदर्श घेणे गरजेचे-
रवी काळे सुरुवातीपासून हुशार व मेहनती होता. त्याच्या वडलांनी मुलांना घडवले. नवीन पिढीने आपल्या कामाशी निष्ठेने राहावे. मेहनत व आत्मविश्वासाने यश संपादन करता येते. मी आयुष्यात अनुभवातून शिकलो नवीन वकिलांना शिकविण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न करतोय, त्यांचेच रुपातंर रवि सारखे अनेक विद्यार्थी मोठे यश संपादित करत आहेत, याचे समाधान वाटते. – अँड. प्रताप परदेशी, ज्येष्ठ वकिल