चांदा – नेवासा तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव शिवारात बिबट्याच्या दहशतीने महिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. म्हाळस पिंपळगाव येथील गंगाधर कोंडीराम आहेर यांच्या गट नं. 151 मध्ये शेतामध्ये दहा ते बारा महिला दोन महिन्यापूर्वी लागवड केलेल्या उसाच्या खुरपणीचे काम करीत असताना त्यांना समोर दोनशे फुटाच्या अंतरावर उसाच्या शेतामध्ये एक बिबट्या व त्याची दोन बछडे दिसले. त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्या त्या ठिकाणाहून गेला. त्या शेतामध्ये महिलांनी खुरपणीचे काम थांबून आपल्या घराकडे धाव घेतली. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीने काही काळ या महिलांमध्ये घबराट पसरली होती.
मुळा कालव्यालगत असणाऱ्या कानिफनाथ कर्डिले यांच्या वस्तीवर बिबट्याने फेरफटका मारला, परंतु परिसरातील शेळ्या तार कंपाऊंडच्या आत असल्यामुळे बिबट्या तिथून तसाच परतला. त्यामुळे या परिसरामध्ये बिबट्याची चांगलीच दहशत पसरली असून शेतकरी उसाच्या व इतर पिकाला पाणी देण्यासाठी व मशागतीसाठी बिबट्याच्या भीतीने जात नाही. वन विभागाने तातडीने या परिसरामध्ये पिंजरा लावावा, या परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्यापासून भय मुक्त करावे, अशी मागणी संजय आहेर व परिसरातील शेतकऱ्यांनी केली.