प्रकाश जावडेकर दिल्ली लढविणार
नवी दिल्ली – महाराष्ट्रासह विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या चार राज्यांमध्ये भाजपने आपल्या सरसेनापतींची निवड केली आहे. महासचिव भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनविण्यात आले आहे. तर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या खांद्यावर दिल्लीची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरला कलम 370मधून मुक्त केल्यानंतर भाजपने आपला मोर्चा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या चार राज्यांकडे वळविला आहे. येत्या दोन-तीन महिन्यात महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे.
अशात, भाजपने या राज्यांमध्ये निवडणूक प्रभारींची नेमणूक केली आहे. भाजपचे महासचिव अरूण सिंग यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आणण्याची जबाबदारी भाजपने राज्यसभेचे खासदार भूपेंद्र यादव यांच्यावर सोपविली आहे. याशिवाय उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि माजी आमदार लक्ष्मण सावदी यांच्यावर सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या खांद्यावर दिल्लीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सध्या दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आपचे सरकार आहे. 70 सदस्यांच्या विधानसभेत आपचे 67 आणि भाजपचे केवळ तीन आमदार आहेत. तीनचे तीस करण्याची जबाबदारी जावडेकर यांना पेलावी लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जावडेकर राजस्थानचे प्रभारी होते, हे येथे उल्लेखनीय. भाजपला कोणत्याही परिस्थितीत दिल्लीचा किल्ला काबीज करायचा आहे. शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि नित्यानंद राय यांना सहप्रभारी म्हणून दिल्लीत तैनात करण्यात आले आहे.
भाजपचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर यांना झारखंडचे प्रभारी बनविण्यात आले आहे. बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नंदकिशोर यादव यांना सहप्रभारी बनविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर हे हरयाणाचे प्रभारी असतील. यूपीचे मंत्री भूपेंद्र सिंग यांना सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.