गांधीनगर – भारतीय जनता पार्टीचे नेते भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांना गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. येथील नव्या सचिवालयाजवळील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारोहात राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी पटेल यांना राज्याचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सरकार असलेल्या 20 राज्यांतील मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पटेल यांच्यासोबतच भाजपचे हर्ष संघवी, जगगदीश विश्वकर्मा, नरेश पटेल, बच्चूभाई खाबाद आणि परषोत्तम सोलंकी यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नव्या सरकारची स्थापना करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 15 जुलै 1962 मध्ये अहमदाबाद येथील गुजराथी कुटुंबात जन्मलेल्या पटेल यांनी सिव्हिल इंजिनिअरींगमध्ये डिप्लोमा केला आहे. ते पाटीदार समाजातील नेते असून त्यांनी 1995 मध्ये आपल्या राजकीय जिवनाची सुरूवात केली.
2010 मध्ये ते अहमदाबाद महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते व त्यांना स्थायी समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते. त्यानंतर 2017 मध्ये म्हणजे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते प्रथमच आमदार म्हणून विजयी झाले. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर पोहोचणारे ते पाटीदार समाजातील पाचवे नेते आहे. यापूर्वी आनंदीबेन पटेल, केशुभाई पटेल, बाबूभाई पटेल, चिमणभाई पटेल या नेत्यांनी हे पद सांभाळले आहे.