इस्लामाबाद :– चीनचा प्रभाव असलेल्या 82 देशांच्या यादीमध्ये पाकिस्तानचा क्रमांक सर्वात वरचा लागतो (Pakistan most influenced by China among 82 countries) आहे. रेडीओ फ्री युरोप आणि रेडिओ लिबर्टी यांनी हे वृत्त दिले आहे. “डबल थिंक लॅब्ज’ या तैवानस्थित संशोधक संघटनेने जगभरातील देशावर असलेला चीनचा प्रभाव तपासण्यासाठी “चायना इंडेक्स’ 8 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा लॉंच केले आहे.
या यादीतील 82 देशांमध्ये पाकिस्तान सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या परदेशी आणि देशांतर्गत धोरण, तंत्रज्ञान आणि सर्वात जास्त अर्थकारणावर चीनचा सर्वात जास्त प्रभाव आहे. पाकिस्तानच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर कंबोडिया आणि सिंगापूरवर देखील चीनचा प्रभाव आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर थायलंड आहे.
दक्षिण आफ्रिका आणि पेरु हे देश संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत. फिलीपाईन्स सातव्या क्रमांकावर, किरीगीझस्तान आठव्या, ताजिकीस्तान नवव्या आणि मलेशियाचा दहाव्या क्रमांकावर आहे. ज्या देशांच्या सीमा चीनच्या शिनजियांग प्रांताला चिकटलेल्या आहेत, त्या मध्य आशियातील देशांवर चीनचा जास्त प्रभाव असल्याचे या पहाणीत दिसून आले आहे. या यादीमध्ये युरोपातील जर्मनी 19 व्या क्रमांकावर अमेरिका 21 व्या आणि ब्रिटन 27 व्या क्रमांकावर आहे.
चीनचा प्रभाव तपासण्यासाठी उच्च शिक्षण, देशांतर्गत राजकारण, आर्थिक संबंध, परदेश धोरण, लष्करी सहकार्य, माध्यम, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक दुवे यासारख्या 9 श्रेणी लावल्या गेल्या होत्या. चीनच्या आर्थिक आणि व्यापारी प्रभावाबद्दल जागृती करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे “डबल थिंक लॅब्ज’चे संस्थापक, सीईओ मिन सुआन वू यांनी सांगितले.